यशाच्या वाटचालीतला निखळ मंत्र!

- पराग माधव पोतदार (वरिष्ठ पत्रकार)
हाती घेतलं ते आवडीनं केलं,
तेव्हा ते काम कधी वाटलंच नाही.
हसत-हसत, आनंदाने करीत गेलो…
आणि अपयशाने वाट रोखलीच नाही….
आपल्या आयुष्यात कामाला विशेष महत्त्व आहे. अनेकांसाठी ते उपजीविकेचे साधन असते, काहींसाठी प्रतिष्ठेचा मार्ग. पण काही थोर व्यक्तींसाठी ते त्यांच्या जीवनाचे ध्येय, प्रेम आणि साधना असते. ज्यांचे कामच त्यांच्या जीवनाचे ध्येय बनते ते काम करून थकत नाहीत. काम हीच त्यांची ऊर्जा असते. त्यांना त्या कामात ताण नाही, तर तृप्तीचे समाधान लाभते. कामाचा आनंद घेणारा माणूसच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो ही गोष्ट या माणसांनी आपल्या जीवनातून दाखवलेली असते.
काम ही केवळ उपजीविकेची गरज नाही, तर आत्म्याचा आविष्कार असू शकतो. आपण आपल्या कामात आनंद शोधू शिकलो तर अवघं जीवन आनंदमय होऊन जाईल. बहुतेक लोक कामाकडे बंधन म्हणून पाहतात. वेळेच्या चौकटीत अडकलेलं, जबाबदाऱ्या आणि थकवा यांचं गाठोडं आहे असं समजतात. पण त्याच कामाला जर आपण अंतर्मनाच्या शांततेने, समर्पणाने आणि उत्साहाने पाहिलं, तर ते केवळ काम न राहता एक साधना, एक आनंदयात्रा ठरू शकते.
आनंद म्हणजे प्रत्येक क्षणात अर्थ शोधण्याची, त्यात सामावून जाण्याची एक वृत्ती आहे. जेव्हा आपण काम करताना स्वतःला विसरतो. ‘मी’ आणि ‘माझं’ या संकल्पनांच्या पलीकडे जातो – तेव्हा आपण एका विलक्षण प्रवाहात प्रवेश करतो. त्या प्रवाहात अहं विरघळतो, वेळ हरवतो आणि उरतो फक्त क्रियेचा निखळ आनंद.
आपण सगळेच जाणतो की रतन टाटा हे एक लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी देशभरात व्यवसायाची उभारणी करताना देश महत्त्वाचा मानला आणि उद्योगात माणुसकीचा स्पर्श आणला. ते म्हणायचे, “यश मोजायचं असेल, तर तो केवळ आकड्यांनी नव्हे, तर समाजासाठी काय दिलं, यावरून मोजा,” त्यांच्या कामाच्या मूळ प्रेरणेचा गाभा त्यांच्या या शब्दांतून उलगडतो. त्यांनी आपली संपूर्ण कारकीर्द केवळ उद्योगवाढीसाठी नव्हे, तर समाज घडवण्यासाठी झोकून दिली. त्यामुळे काम करणे हेच त्यांचे आनंदनिधान होते. सामान्यांच्या आवाक्यात चारचाकी आणण्याचा टाटा नॅनोचा स्वस्त कारचा पर्याय असो किंवा कोरोना काळात कर्मचाऱ्यांचे पगार कायम ठेवण्याचा निर्णय असो. त्यांनी प्रत्येक गोष्टीत आपली जबाबदारी आनंदाने स्वीकारली. त्याचं ओझं मानलं नाही. त्यामुळे त्यांचे काम आणि जीवन दोन्ही नव्याने ऊर्जा देणारे होते. म्हणूनच ते आजही हजारोंना प्रेरणास्त्रोत वाटतात.
काम करताना आनंद घेण्यासाठी मनाची उपस्थिती अनिवार्य असते. मन जेव्हा भूतकाळाच्या पश्चात्तापात किंवा भविष्याच्या चिंतेत अडकलेलं असतं तेव्हा ते गोंधळतं. संभ्रमित होतं. वर्तमान क्षणाशी जोडलेलं मन कामात तल्लीन होऊ शकतं. मग ती कृती लहान असो की मोठी, साधी असो की गुंतागुंतीची, त्यात एक शांत समाधानाची झुळूक कायमच जाणवते.
या संदर्भात देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे उदाहरण अगदी आवर्जून द्यायला हवे, प्रत्येक क्षणाशी प्रामाणिक राहून कसा आनंद घेत काम करायचे याचा ते मूर्तीमंत आदर्श होते. डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे भारताच्या विज्ञानजगतातील एक तेजस्वी सूर्य म्हणून गणले जातात पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वांत मोठा गुण म्हणजे कामातला निखळ आनंद घेण्याची त्यांची वृत्ती. ते प्रयोगशाळेत रात्रंदिवस थांबत असत. भारताला अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात आणि संरक्षणसिद्धतेत स्वयंपूर्ण बनवण्याचे उदात्त स्वप्न त्यांनी पाहिलेले होते. ते प्रयोगशाळेत रॉकेटचे तुकडे पुन्हा-पुन्हा जुळवत आणि तरी त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित असे.
एकदा डॉ. एपीजे अब्दुल कलाम असेच कामाचा आनंद घेत त्यात रमलेले असताना त्यांच्या टीममधील एका इंजिनिअरने विचारले, “सर, तुम्ही इतका वेळ काम करता, तुम्ही थकत नाही का?”
त्यावर कलाम हसले आणि म्हणाले,”मी जेव्हा राष्ट्रासाठी आणि विज्ञानासाठी काम करत असतो तेव्हा ते श्रम वाटत नाही तर ती माझ्यासाठी पूजा असते.”
पहा, आपल्या कामाकडे पाहण्याचा किती उदात्त दृष्टिकोन आहे हा..!
त्यांचा प्रत्येक प्रयोग हा एक नवा उत्सव असे. हेच कारण आहे की, आज अनेक विद्यार्थी आणि वैज्ञानिक त्यांच्याकडे ‘कार्यसंस्कृती’ शिकण्यासाठी पाहतात.
काम आनंददायी होतो जेव्हा आपण त्याला आपल्या अस्तित्वाशी एकरूप करतो. आपण करतो ती कृती म्हणजे आपली मूल्यं, आपली आस्था, आपलं सौंदर्यदृष्टी यांचं प्रतिबिंब असतं. एखादं वाक्य लिहिणं असो, एखादा खेळ मनापासून खेळणं असो, झाडांना पाणी घालणं असो, एखादी योजना आखणं असो जर ते आपण पूर्ण जागरूकतेने आणि समर्पणाने केलं, तर त्यातून निर्माण होणारा आनंद आतल्या समाधानातून येतो. ती आनंदाची भावना शांत, सखोल आणि टिकाऊ स्वरुपाची असते.
सचिन तेंडुलकर आयुष्यभर क्रिकेट खेळला. त्याने ज्या समर्पण वृत्तीने या खेळाला आपलं जीवन समर्पित केलं त्यामुळे त्याच्यासाठी खेळ हा व्यावसायिक वृत्ती करायची गोष्टच राहिली नाही तर त्याच्यासाठी तो श्वास बनला. सचिन एका मुलाखतीत म्हणाला होता, “क्रिकेट माझं प्रेम आहे, धर्म आहे आणि त्याही पलीकडे माझं अस्तित्व आहे,” लहानपणापासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास जसा खडतर कष्टाचा, मेहनतीचा होता तसा तो त्याला प्रत्येक टप्प्यावर यश आणि आनंद देणारा होता. सचिनने एकदा सांगितलं होतं, “मी जेव्हा मैदानात असतो, तेव्हा मी इतर सारे काही विसरतो. त्यावेळी फक्त मी आणि क्रिकेट असतं.”
हे असतं आपण जे करतोय त्या विषयीचं समर्पण. त्यांचं खेळातलं हे निखळ प्रेमच त्याला दीर्घकाळ मैदानावर टिकवू शकलं. दुखापती, अपयश, दबाव काहीही वाट्याला आलं तरी त्याने कधीही क्रिकेटची गोडी कमी होऊ दिली नाही.
कामामध्ये सौंदर्य शोधणं हेही एक साधन आहे आनंदासाठी. कामातल्या हालचाली, त्याचा ताल, त्यातील बारकावे, रंग, गंध हे सगळं डोळसपणे अनुभवायला शिकणं म्हणजेच त्या कामात सौंदर्य शोधणं. मग अगदी एकसुरी वाटणारी कृतीही आपल्या मनाला आल्हाददायक वाटू लागते. ती केवळ काम न राहता, ध्यान बनते.
भारतरत्न गानकोकिला लता मंगेशकर तर आपल्या गाण्याला ती ईश्वरसेवा आहे असं म्हणत असत. लतादीदींच्या सुरेल आवाजात जसा माधुर्याचा ठेवा होता, तसाच त्यांच्या कामातील एकाग्रतेत एक निराळाच आध्यात्मिक आनंद होता. त्यांनी हजारो गाणी गायली, पण प्रत्येक वेळी तितक्याच समर्पणाने गायली. म्हणून लताचा स्वर जगात अजरामर झाला. त्या म्हणत, “माझ्या सुरांमध्ये मी देव शोधते,” त्यांचे गायन त्या इतकं तल्लीनतेने आणि मनापासून करीत की कामातले बारकावे, मेहनत, तयारी या सगळ्यांमध्ये आनंदाची झुळूक सतत वाहत असे. म्हणूनच त्यांच्या सुरांमध्ये भावसंपन्नता होती, नुसता तांत्रिक परिपूर्णता नव्हती.
वरील सगळी उदाहरणे पाहता आपल्या हे नक्की लक्षात येईल की, काम करताना आनंद घेणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाला एका उच्च पातळीवर नेणं असतं. चांगलं, मनापासून काम करणं आणि त्या रमणं ही जगण्याची शैली बनायला हवी. कामाचं ओझं वाटू लागलं की, श्रमाचं ओझं वाटू लागतं. पण कामाचा आनंद असला की वेळेचे अडसर कधीच आड येत नाही. जेव्हा कृती आनंदाने होत असते तेव्हा ती केवळ कृती राहत नाही तर ती एक प्रार्थना होते.
चला तर मग, आपल्याच कामाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलू या…